
सुकमा – निवडणुकीला विरोध करणा-या माओवाद्यांनी शनिवारी छत्तीसगडमध्ये केलेल्या दोन वेगवेगळया हल्ल्यांमध्ये १३ जण ठार झाले आहेत. ठार झालेल्या मध्ये सीआरपीएफच्या पाच जवानांचा समावेश आहे.
बिजापूरमध्ये माओवाद्यांनी सकळी अकराच्या सुमारास निवडणूक पथकाच्या सदस्यांना घेऊन जाणारी बस स्फोटामध्ये उडवून दिली. या हल्ल्यात निवडणूक पथकातील सात सदस्यांचा मृत्यू झाला. दुस-या एका घटनेत दर्भा घाटीमध्ये सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोटामध्ये उडवून दिली.
या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. चार जवान जखमी झाले. बस्तर येथील निवडणूकीचे काम संपवून हे पथक परतीच्या मार्गावर असताना हा हल्ला झाला.
या आठवडयाच्या सुरुवातीला सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या बस्तर जिल्ह्यात लोकसभेसाठी एकूण ४७ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी दहा एप्रिलला छत्तीसग़डमध्ये मतदान होत असताना माओवाद्यांनी दहा मतदान केंद्राजवळ गोळीबारही केला होता.









