
यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यातील मागास भाग हा विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. मागास भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपण दौ-यावर आलो असून, हया भागातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
आज 10 डिसेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यवतमाळ जिल्हयातील केळापूर तालुक्यातील आकोली (बु) येथील संत गाडगे महाराज मिशन मुंबईच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या संत गाडगे महाराज आदिवासी प्राथमिक शाळेला भेटीप्रसंगी विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून राज्यपाल बोलत होते.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परीमलसिंग, आ.राजू तोडसाम, आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते पाटील मंचावर उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले, प्रत्येकाला भेटता यावे यासाठी मी इथे आलो आहे. स्वच्छ भारताचे काम संत गाडगेबाबांच्या प्रेरणेतून सुरु आहे. पूर्वीच्या आंध्रप्रदेश आणि नव्याने अस्थित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात 100 वर्षापूर्वी रामजी गोंड या आदिवासीने इंग्रजांविरुध्द बंड पुकारुन आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावरील हक्कांसाठी लढा दिला. आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावर हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. केवळ आदिवासीच नव्हे तर ओबीसी, अनूसूचित जाती व इतर घटकांच्याही समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. संत गाडगेबाबा यांच्या पुतळयाला राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करुन आश्रमशाळा परिसरात बांधण्यात आलेल्या स्व राजारामबापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यावेळी संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधूसूदन मोहिते पाटील यांनी राज्यपालांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रास्ताविक मिशन चे सचिव सचिन घोंगटे यांनी तर रविद्र बायस्कर यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.









