माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

sadashiv
मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते आणि माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. मुंबईच्या बॉम्ब हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते (८०) वर्षांचे होते.
मागच्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सदाशिवरावांवर कोल्हापूरमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रात्री त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले अखेर एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सात ऑक्टोंबर १९३४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात मुरगड गावी त्यांचा जन्म झाला होता. कॉंग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्द सुरु करणारे सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभेमध्ये तीनवेळा खासदार म्हणून कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केले. कागल विधानसभा मतदारसंघातून चारवेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते.
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, काम करणारा, वेळेला धावून येणारा नेता अशी सदाशिवराव मंडलिकांची जिल्ह्यामध्ये ओळख होती. त्यामुळेच कोल्हापूरच्या जनतेने प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास दाखवला. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरु करणारे सदाशिवराव मंडलिक नंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
२००९ मध्ये शरद पवारांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. दांडगा जनसंपर्क आणि आपल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकली. सदाशिवरावांवर मुरगड या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक सध्या शिवसेनेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− four = 2