यवतमाळ – अवैध वीटभट्टी चालविल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी माजी सैनिकाकडून १७ हजार रुपये लाच स्वीकारताना सावळी सदोबा येथील मंडळ अधिकाºयास रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयात ही कारवाई केली.
रमेश रामभाऊ मादेशवार (४८) असे लाचखोर मंडळ अधिकाºयाचे नाव असून ते सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयात कार्यरत आहे. सुभेदार सैयद अब्दुला शाहा (४७) रा. चिखलवर्धा ता. घाटंजी हे माजी सैनिक असून त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला परवाना नसून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो, अशी धमकी मंडळ अधिकारी मादेशवार यांनी माजी सैनिकाला दिली होती. कारवाई टाळावयाची असेल तर ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर तोडगा काढून २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचवेळी तीन हजार रुपये घेतले व उर्वरित रक्कम १७ हजार रुपये ७ फेबु्रवारी रोजी कार्यालयात घेण्याचे ठरले होते. याबाबतची तक्रार सुभेदार सैयद यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून सदर विभागाच्या अधिकाºयांनी पडताळणी केली असता, मंडळ अधिकाºयाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचून मंडळ अधिकाºयाला १७ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईने तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून लाचखोर कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, सुशील झोडगेकर, प्रकाश शेंडे, सुधाकर कोकेवार, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार यांनी केली.









