

‘अनुमती’ सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटानंतर ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहेत. ‘पोस्टकार्ड’ असे त्यांच्या नव्या चित्रपटाचे टायटल असून स्मिता विनय गानू आणि विनय गानू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन अशा विविध जबाबदा-या प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पार पाडल्या आहेत.
मानवी भाव-भावनांचा गुंता एका पोस्टमॅनच्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अनुमती’ चित्रपटासारखीच तगडी स्टारकास्ट ‘पोस्टकार्ड’मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचे रंग उधळणार आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवलमध्ये आधीच पसंती मिळालेला ‘पोस्टकार्ड’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.१९६५ ते ७० या दरम्यानच्या काळाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आलाय. एका पोस्टमॅनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दु:ख, आनंद याचा अनुभव पोस्टमॅनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमॅन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. रूपक कथा ह्या फार्म मध्ये हा ‘पोस्टकार्ड’ चित्रपट सादर होतो. जो मानवी भावनांचा गुंता आणि नियतीची अढळता यातुन काही भावव्याकुळ माणसं ह्या कथेत समोर येतात. ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत स्मिता विनय गानू व विनय गानू यांची निर्मिती असलेल्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आहेत. दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांचे आहे. तर कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, अभिनेत्री सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुहिता थत्ते, अभिनेता वैभव मांगले यांचा समावेश आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश राजगुरू, संकलन मयूर हरदास तर संगीत गंधार संगोराम व पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे. ध्वनी संयोजन नरेन्द्र भिडे, नृत्य संयोजन फुलवा खामकर तर कला दिग्दर्शन दत्ता लोंढे यांचे आहे. चित्रपटातील गाणी हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, नंदिनी श्रीकर या गायकांनी गायिली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून प्रशांत गोखले तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून रोहन शाह यांनी जबाबदारी पार पाडली.









