
पुणे (अमीत इंगोले) – आपल्या नृत्याच्या अदाकारीने लक्ष वेधणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच वेगवेगळ्या नृत्यशैलीतून प्रेक्षकांसमोर येत असते. ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित आणि के. विलास दिग्दर्शित ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी चित्रपटातून मानसी नाईक एका धमाकेदार आयटम सॉंगमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी पें’, असे बोल असणा-या या गाण्यावर मानसी नाईकने दिलखेचक नृत्य सादर केलंय. या गाण्याचे वेगळेपण म्हणजे ‘रिक्षावाला फेम’ रेश्मा सोनावणे यांनी गे गाणं गायलं असून यांचे नृत्यदिग्दर्शन ‘डीआयडी फेम’ सिद्धेश पै यांनी केलं आहे.
के. विलास यांनी लिहिलेल्या गीताला सलील अमृते यांचं संगीत लाभलं असून नुकतंच या आयटम सॉंगचे चित्रीकरण नायगांव येथील आर.डी.एल स्टुडिओत करण्यात आलं. ‘एकता एक पॉवर’ या चित्रपटातून एक सामाजिक एकात्मतेचं महत्व सांगणारी कथा रेखाटण्यात आली असून या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर आणि विद्याधर जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘दिग्दर्शक के.विलास यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिलेत.
मानसीने यापूर्वी रेश्मा सोनावणे यांच्या आवाजातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर आपला जलवा दाखविला होता. रिक्षावालाप्रमाणे ‘एकता एक पॉवर’ मधील हे गाणं ही सर्वांना ठेका धरायला लावेल असा विश्वास मानसी नाईकने चित्रीकरणावेळी व्यक्त केला आहे. मानसी सोबत असलेल्या उत्तम ट्युनिंगमुळे हे आयटम सॉंग करताना खूप धम्माल आल्याचं मत नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै यांनी व्यक्त केलं









