
पुणे : गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेच्या उंबरठय़ावर रेंगाळलेल्या मान्सूनच्या वाटचालीत प्रगती झाली असून, गुरुवारी मान्सूनने अरबी समुद्राच्या दक्षिण भागात प्रवेश केला.
नैऋत्य मौसमी वार्याची प्रगती गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेमध्येच रेंगाळली होती. निर्धारित वेळेच्या आधी दाखल होऊनही म्हणावी तशी प्रगती दिसत नसल्याने प्रत्यक्ष पाऊस हुलकावणी देत राहिला. लागोपाठ आठ दिवस श्रीलंकेत ठाण मांडून बसल्यानंतर गुरुवारी त्याच्या वाटचालीत प्रगती दिसून आली. श्रीलंकेचा अर्धा भाग, दक्षिण अरबी समुद्र, कॉमोरीन प्रदेश व बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग व्यापला आहे. यंदा मान्सून निर्धारित वेळेपूर्वीच केरळमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या वाटचालीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न झाल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.









