‘मार्शल’चा संघर्षमय ‘विजय’पथ

vijay

‘मार्शल’चा संघर्षमय ‘विजय’पथ
कहाणी एका युवा उद्योजकाची
यवतमाळ – ‘अशक्य’ हा शब्द ज्यांच्याजवळ नसतो तेच विजेते होतात…उराशी बाळगलेले मोठे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने ते धावत असतात… अडचणी…संकट त्यांना रोखत नाही. ते धावतात एका ध्यासाने ध्येयाकडे..आणि एक दिवस तो विजयाचा आनंद त्यांच्या कवेत येतो. अशाच एका मार्शल तरुणाची ही कहाणी…यवतमाळ येथील विजय तुळशिराम वासनिक या तरुणाने बारावीत असताना आपण दुसºयाची गुलामी करण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. जिद्द, चिकाटी कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन केले. त्याने यवतमाळात सन २००३ मध्ये आपल्या उद्योगाची सुरूवात केली. आज तो ‘टोडल डिवाईन पॉवर प्रोडक्ट’ या मॅनुफॅक्टरींग कंपनीचा मालक असून प्रॉडक्टला विदर्भ व मराठवाड्यात मागणी आहे. उद्योग सुरू होवून दहा वर्षाचा कालावधी लोटत आहे. अनेक संकट आली, मंदीचा फटका सहन करावा लागला. मात्र प्रॉडक्टला दिलेल्या ‘टोडल’ नावाप्रमाणे हळूवार पण मजबूत दिशेने प्रवास सुरू आहे.
उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत असताना त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला नाही. वडील सरकारी नोकरीत, आई गृहीणी, उद्योगक्षेत्रात कुणीही नाही. मार्गदर्शन कुणाचे घ्यावे, या बाबत माहिती नाही, तरीही विजय उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत होता. सुरूवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असल्यामुळे आपल्या मुलाने उच्च शिक्षण डॉक्टर, इंजिनिअर बनावे, अशी आई, वडीलांची इच्छा होती. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर सायंन्सला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र त्याचे मन अभ्यासऐवजी वेगळयाच विश्वास रमत होते. शेवटी व्हायचे तेच झाले…बारावी नापासचा शिक्का बसल्यावर त्याने पुन्हा आय.टी.आय ला प्रवेश घेतला. कसाबसा आयटीआयचा ट्रेड पूर्ण केला. पोरगं वाया गेलं म्हणून नातेवाईक, शेजारी, आईवडील सर्वांची त्याच्याकडे बघण्याची नजर बदलून गेली. काही तरी व्यवसाय केला पाहिजे म्हणून सुरूवातीला सागवान कटाईचा व्यवसाय सुरू केला. अनुभव कमी पडला आणि धंद्यात घाटा करून घेतला. दुसºया वर्षी कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला. येथेही पहिल्याच वर्षी घाटा आला. तिथेही जम बसला नाही. वडीलांचे पैसे असेच खर्च झाले. त्यामुळे आईवडीलांचा विजयवरील विश्वास डळमळीत होणे सहाजिकच होते. आता घरून पैसे मिळणार नाही याची जाणिव व्हायला वेळ लागला नाही. आपला उद्योग असावा असे वाटत होते. पण त्यासाठी मशिनरी, भांडवल लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ पैसा नाही. याची जाणीवही त्याला होत होती. तरी देखील उद्योजक होण्याची स्वप्न पाहत होता. ती साकार करण्यासाठी तो नियोजनही करीत होता पण पैश्याचे सोंग घेता येत नाही, हे विसरत नव्हता. एक दिवस घरची पंक्चर सायकल उचलली, खिशात दोन-चारशे रुपये जमा करून ठेवले होते. सरळ अगरबत्तीच्या दुकानात गेला. ठोक भावात माल खरेदी केला. सायकलवर टांगून दुकानात जावून माल विक्री सुरू केली. व्यवसायातून काही पैसे आल्यावर अगरबत्ती सोबत परफ्युम, मोमबत्ती व इतर सामान विक्री करीत होता. पंक्चर सायकलवर माल ठेवून शहरात झपाटल्यासारखा फिरत होता. प्रत्येक दुकानात जावून माल विक्री करीत होता. जेंव्हा-केंव्हा वेळ मिळेल तेंव्हा जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाºयांशी संपर्क साधून उद्योगाबाबत माहिती जाणून घेत होता. सुरूवातीला एकाही अधिकाºयाने त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे कधी-कधी तो निराश व्हायचा पण लगेच आपल्याला कुणाची गुलामगिरी करायची नाही. उद्योजक व्हायचे आहे, अशी स्वत:ला आठवण करून द्यायचा. त्याची व्यवसायात काही करण्याची जिद्द बघून अनेकांनी मदत केली. काहींनी खिल्ली उडवून कार्यालयाबाहेर हाकलून दिले. तरी त्याने हार मानली नाही. कसेबसे भांडवल उभे करून सरळ मुंबई गाठली. कुणीही ओळखीचे नसताना आठवडाभर सतत पायदळ भटकंती केली. अखेर ‘गोदरेज केमिकल’ कंपनीचा पत्ता मिळाला. या कंपनीतील अधिकारी आपल्याला प्रतिसाद देतील की नाही, या प्रश्नाने भांडावून सोडले होते. कशीबशी व्यवस्थापकांच्या कॅबीनमध्ये ‘एंन्ट्री’ मिळाली. आपला परिचय देवून उत्पादन सुरू करण्याबाबत माहिती विचारून रॉ मटेरीयलची मागणी नोंदविली. सुरूवातीला थोडा अनुत्साह दाखविणाºया अधिकाºयांनी व्यवसाय करण्याची जिद्द पाहून यथायोग्य मार्गदर्शन केले. हा प्रसंग विजयसाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नव्हता. आपणच एखाद्याला माहिती व मार्गदर्शन करण्याबाबत का-कू करतो. मात्र मोठी माणस मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. नवीन व्यवसाय करणाºया व्यक्तीला प्रोत्साहीत करण्याचे काम करीत असल्याचा अनुभव सांगितला. सन २००३ मध्ये ‘टोडल डिवाईन पॉवर प्रॉडक्ट’ या नावाने मॅन्यूफॅक्चरींग सुरू केले आणि ग्लिसरीन, गुलाबजल, मुलतानी मिट्टी, फरर्निचर पॉलीश या उत्पादनाला विदर्भ- मराठवाड्यात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. उद्योगात भरभराटी होत असताना मंदीमुळे त्याला निळ, व्हॅसलीन, परफ्यूम या प्रॉडक्टचे उत्पादन बंद करावे लागले. यामुळे मधल्या काळात व्यवसायाला उतळती कळा लागली होती. मात्र पुन्हा ‘फिनिक्स’प्रमाणे ‘मार्शल’ भरारी घेत नव्या उमेदीने उद्योग सुरू केला. आज टोडलचा हळूवार पण मजबूत प्रवास सुरू झाला आहे. विजय वासनिक या युवा उद्योजकाला व्यवसाय उभारणीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, याची जाणिव आहे, म्हणूनच आपला व्यवसाय सांभाळून नवीन व्यवसाय करणाºया युवकांना मार्गदर्शन करण्याचे कामही करतो आहे. त्याच्या मदतीने यवतमाळातीलच नव्हे; तर नागपूरातील काही युवकांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले असून त्यांचाही प्रवाशी यशस्वीतेच्या दिशेने सुरू आहे. संघर्षातून व्यवसायात जम बसत असल्याचे समाधान आता त्याच्या चेहºयावर आहे.
उद्योजकतेला हवी चिकाटीची जोड
आपण व्यवसायात यशस्वी होऊ की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. उंच भरारी घेण्याआधी पहिले पाऊल टाकणे महत्वाचे आहे. व्यवसाय म्हटले की मराठी माणूस नफ्याचा विचार करण्याऐवजी तोटा झाला तर काहीच उरणार नाही, हा विचार करतो. हा विचार सोडून जिद्द आणि चिकाटीने व्यवसायात झोकून दिले तर यशापासून कुणीही रोखू शकणार नाही. मराठी पाऊल व्यवसायाच्या दिशेने पडत आहे, हे आशादायी चित्र असल्याची प्रतिक्रीया विजय वासनिक या युवा उद्योजकाने दिली.
(साभार- दै. पुण्य नगरी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = five