
नवी दिल्ली – हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सडकून टीका केली आहे. ‘मालवीय यांना भारतरत्न देणं हे चुकीचं आणि असमर्थनीय आहे,’ असं परखड मत गुहा यांनी मांडलंय. त्यांच्या या मतामुळं नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पंडित मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचं जाहीर केलं. राष्ट्रपतींच्या या घोषणेचं सर्वत्र स्वागत होत असताना इतिहासकार गुहा यांनी मात्र काहीसं वेगळं मत मांडलं आहे. ‘भारतरत्न’च्या वृत्तावर गुहा यांनी एकामागोमाग एक ट्वीट्स केले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याचं स्वागत करताना गुहा यांनी मालवीय यांना हा सन्मान दिल्याबद्दल जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
गुहा यांचे ट्वीटस्
”वाजपेयींना भारतरत्न देणं ठीक आहे. त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. पण मृत्यू होऊन बराच काळ लोटलेल्या किंवा इतिहासातील व्यक्तीला ‘भारतरत्न’ देणं योग्य वाटत नाही. मालवीयांच्या बाबतीतही माझं तेच मत आहे. आणि मालवीयांना द्यायचंच होतं तर मग रविंद्रनाथ टागोर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, स्वामी विवेकानंद, अकबर, शिवाजी महाराज, गुरुनानक, कबीर, सम्राट अशोक यांना हा सन्मान का नाही?”









