
औरंगाबाद -एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दारू पाजवून मावसभावाने बलात्काराचा प्रयत्न केला. बीडबायपास परिसरातील निर्जन ठिकाणाहून या मुलीने प्रसंगावधान राखत त्याच्या डोळ्यात माती फेकून पळ काढला. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या तिच्या सख्या भावाला मारहाण करण्यात आली. मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर पालकांनी मुलीसह गुन्हे शाखेत धाव घेतल्यानंतर मावसभाऊ, त्याची पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी परिसरातील एक सोळा वर्षांची मुलगी लहान असल्यापासून मावशीकडे राहते. मावसभाऊ राम सूर्यभान काळे (वय ३२) याने गुरुवारी रात्री तिला हॉटेलातून भाजी आणण्याचा बहाणा करून दुचाकीवरून घराबाहेर नेले. एका ठिकाणाहून दारूच्या दोन बाटल्या खरेदी करून तिला बीडबायपासवरील निर्जन कलर फॅक्टरीत नेले. येथे स्वतः दारू पिली, तिलाही दारू पिण्याची बळजबरी केली. तिने नकार दिल्यानंतर बलात्काराचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रसंगावधान राखत त्याच्या डोळ्यात माती फेकून पळ काढला. तिने मुकुंदवाडीतील आईच्या घरी येऊन घडलेली घटना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाला राम काळे, त्याची पत्नी राधा व आई पद्माबाई यांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.









