माहुर – शहरातील गणेश नगरस्थित एका प्लॉटमध्ये गुप्तधन सापडल्याची चर्चा आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.
शहरात पुरातन गणेश मंदिराच्या पायथ्याशी प्रभाग क्र. चार मध्ये मधुसुदन भारती यांंचे नावे प्लॉट असून त्यावर मुन्ना नामक व्यक्तीचा ताबा आहे. १२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी अनमाळ येथील पायाळू व्यक्ती, विदर्भातील एक मौलवी याच्या मध्यतीने येथील सोनेरी टोळीने सदर प्लॉटमध्ये खोदकाम केले. त्यामध्ये दोन सोन्याने भरलेले हंडे सापडले असून टोळी घेऊन पसार झाल्याची चर्चा आहे. ही वार्ता शहरात पसरताच गणेश मंदिराजवळ बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यापूर्वी शहरातील रामगड किल्ला, सोनापिर दर्गा, पुरातन वास्तुतुन गुप्तधन काढण्याचे प्रकार तचेस त्यासाठी नरबळी दिल्याच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद आहे. परिसरात नव्याने सोनेरी टोळी सक्रीय झाली असून गुप्तधन शोधण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.









