
माहूर (नांदेड) दि. १९ (सरफराज दोसानी)- घरकुलाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांला १० हजार रुपये लाचेची मागणी येथील नगराध्यक्षांनी केली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
रमाई घरकुल योजनेंतर्गत केशव भगत यांना घरकुल मंजूर झाले होते. शासनाच्या नियमानुसार भगत यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक कागदपत्र संबंधित विभागात दिले. मात्र, या लाभार्थ्यांला अनुदान दिले नाही. दरम्यान, माहूरच्या नगराध्यक्ष गौतमी कांबळे यांनी लाभार्थ्यांला आकाश रमेश कांबळे यांच्या मध्यस्थीने अनुदान देण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. तसेच ११ व १२ फेबु्रवारी रोजी मोबाईलवरून एसएमएसवरून उर्वरित ३ हजार रुपये नगर परिषदचे कारकुन सिडाम यांच्याकडे दे, असा संदेश पाठविला. त्यावरून भगत व आकाश कांबळे यांनी नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून २० फेबु्रवारी रोजी नगर परिषदची सर्वसाधारण सभा असल्याने व ठरलेले पैसे देण्यासाठी भगत गेले होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा आहे पैसे घरी आणून दे, असे नगराध्यक्षांचे व्हाईस रेकॉर्ड लाच लुचपत विभागाने रचलेल्या सापळ््यात मिळून आले. त्यावरून आज १९ मार्च रोजी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला. कांबळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामाचा पंचनामा, गुत्तेदार, एजन्सी व त्याचे बँक अकाऊन्ट तपासले जाणार आहे. ही कार्यवाही अप्पर पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एम.जी. पठाण, पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, जमा. अशोक देशमुख, चंद्रकात कदम, वामन कोकाटे, व्यंकट शिंदे, विनोद साखरकर, महिला पोलीस रत्नपारखे, चालक शेख अन्वर, अनिल कदम यांनी केली.









