मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशीचे आदेश

pankajamunde
नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची ‘सीबीआय’द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ‘सीबीआय’मधील सूत्रांनी सांगितले.
सध्या हे प्रकरण कार्मीक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विभाग असून यासंदर्भात अधिकृत आदेश दिल्यानंतर ‘सीबीआय’ या अपघाताचा तपास सुरु करेल असे सूत्रांनी सांगितले. मुंडेंच्या अपघाताप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ‘सीबीआय’ दिल्ली पोलिसांकडून हे प्रकरण आपल्या हाती घेईल. मागच्या आठवडयात तीन जून रोजी गोपीनाथ मुंडे दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गा़डीला समोरुन आलेल्या इंडिका गाडीने धडक दिली होती. या अपघातात मुंडे यांचे निधन झाले होते. मुंडे यांच्या मानेला आणि यकृताला गंभीर मार लागला होता. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघाती मृत्यू असला तरी, हा अपघात नसून, घातपात असल्याची अनेकांना शंका अनेकांनी व्यक्त केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही संतप्त झालेल्या बीडच्या जनतेने सर्वपक्षीय नेत्यांच्या गाडयांना घेराव घालत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अन्य भाजपच्या नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यासंदर्भात मंगळवारीच महाराष्ट्र भाजपचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − three =