मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर

images (7)
मुंबई, दि. १३ – टोलप्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर धावून आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सचिनने मुंबईकरांचा त्रास कमी करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटच्या मैदानात तूफान बॅटिंग करणारा आणि खासदार असलेल्या सचिनने मुख्यमंत्र्यांना २० फेब्रुवारी रोजी लिहीलेल्या पत्रात टोलप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना सचिन खारघर टोलनाक्याजवळील ट्रॅफिकमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे त्याला मुंबईकरांना रोज सामो-या जाव्या लागणा-या समस्येची जाणीव झाली. मुंबईतील अनेक टोलनाक्यांवर रोज अशीच वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणही खूप वाढते, या सर्व समस्या लक्षात आल्यानेच सचिनने पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहीले.
शहरातील विविध टोलनाके, त्यामुळे उद्भवणा-या ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबईकरांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे, असे सचिनने पत्रात म्हटले आहे. तसेच टोल वाढवूनही रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचेही सांगत त्याने नाराजी वर्तवली असून या प्रक्रियेचा फेरविचार करण्यात यावा आणि मुंबईकरांचा त्रास कमी करावा अशी अपेक्षा त्याने पत्रात व्यक्त केली आहे. तसेच सायन-पनवेल मार्गावरील नव्या टोलनाक्यासह एकूण नऊ टोलनाक्यांवरील बिकट परिस्थितीही त्याने पत्राद्वारे निद्रशनास आणून दिली आहे. हे टोलनाके कमी करण्याची गरज असल्याचे मतही त्याने मांडले आहे. टोलनाक्यांजवळ उद्भवणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल असा सल्लाही सचिनने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याचा विषय राज्यभरात गाजत आहे. मनससेह विविध राजकीय पक्षांनी टोलप्रश्नी आंदोलने केली आहेत. आता खुद्द सचिन तेंडुकरनेच याप्रश्नी आवाज उठवल्यानंतर तरी सरकार याकडे गांभीर्याने बघेल का आणि नागरिकांचे प्रश्न सुटतील का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 8 = sixteen