२०० जागा लढण्याचा निर्धार
यवतमाळ – लोकसभेतील पराभवाला खचून न जाता पक्ष विधानसभा डोळ््यासमोर ठेवून कामाला लागला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उभारी आली असून, मनसेच राज्याचा मुख्यमंत्री ठरविणार असल्याचा विश्वास सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी ते आज शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ते विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यात मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असून, २०० मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे. निवडणुका म्हटल्या की जय-पराजय निश्चितच आहे. मात्र, लोकसभेच्या पराभवामुळे मनसे खचली नसून, मनसेकडे राज ठाकरे सारखे कणखर नेतृत्व असल्यामुळे भविष्यात पक्षाची वाटचाल चांगली जाणार आहे. पक्ष निवडणुकी पुरताच नसून, जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढणारा पक्ष असल्याचे यावेळी आ. शिंदे म्हणाले. विधानसभा काबीज करण्यासाठी निवडणुकीत मनसे वेगळे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी मनसेची असून, माझ्या दौºयामध्ये मनसेला जिल्ह्यातील तीन मतदारसंघ पोषक असल्याचे पाहणीत आले. मात्र, त्या मतदारसंघाचे नाव सांगण्याचे आ. शिंदे यांनी टाळले. आज यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील कार्यकत्यांच्या बैठकी घेण्यात आल्या असून, इच्छूक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी लांबलचक यादी आहे. मुंबई येथे अहवाल सादर केल्यानंतर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात मनसेमध्ये गटबाजी असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी माझ्या पाहणीत आढळून आले नसल्याचे सांगितले. यावेळी माजी आ. जयप्रकाश बावीस्कर, सरचिटणिस शिरीष सावंत उपस्थित होते.









