
यवतमाळ, दि. २५ – बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जगदंबा अभियांत्रिकी कॉलेजच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मोहिनी गायकवाड (१६) रा. झाडकीन्ही हल्ली मुक्काम यवतमाळ असे मृत मुलीचे नाव आहे. झाडकीन्ही येथील किरण गायकवाड यांच्या दोन मुली येथील दांडेकर ले-आऊटमध्ये भाड्याने राहत होत्या. मोठी बहिण खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. तर मृतक मोहिनी गायकवाड (१६) ही दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर घरीच होती. दोघी बहिणी आंनदाने राहत असताना, अचानक २३ डिसेंबरला मोहिनी घरून निघून गेली. उशिरापर्यंत बहिण घरी न परतल्याने घाबरलेल्या मोहिनीच्या मोठ्या बहिणीने वडगाव रोड पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी मोहिनीचा शोध सुरू केला असताना, दरम्यान आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आर्णी मार्गावरील जगदंबा अभियांत्रिकी कॉलेजच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत मृतदेह असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंडीत आखरे यांच्या शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. यावेळी मृतदेहाचे वर्णन व अंगावरील कपड्यावरून हा मृतदेह मोहिनीचा असल्याची ओळख पटली. पोलिसांनी मोहिनीच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर तिची बहिण व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, मोहिनी गेल्या दोन वर्षापासून मानसिक आजारी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मोहिनीने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह श्वविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. यावेळी घटनास्थळाला एसडीपीओ डॉ. शीतल जानवे यांनी भेट दिली होती.









