
आरोपीमध्ये वडीलांचा समावेश, आईच्या सतर्कतेने प्रयत्न फसला
माहुर – ( प्रतिनिधी) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साईबोरी येथील अल्पवयीन मुलीला परप्रांतात विक्री करण्याचा डाव तीच्या आईने हाणूण पाडला. माहुर पोलिसांनी मुलीच्या वडीलासह टोळीतील सदस्यांना जेरबंद केले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
इंदल मोहन राठोड (४०) रा. साईबोरी ह.मु. पापलवाडी जि. नांदेड, दलाल काळु तुकाराम जाधव (२७) रा. खंडवा जि. खैरगौन मध्यप्रदेश याच्यासह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले. राठोड याने आपल्या अल्पवयीन मुलीला जाधव या दलालाच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील व्यक्तीला ५० हजार रुपयात विकले. त्यानंतर तीचा जबरीने विवाह करून देण्यात येणार होता. हा प्रकार मुलीची आई कुनीबाई राठोड हीला माहीत होताच माहुर पोलिसांना माहीती दिली. त्यावरून पोलीसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली असून क्रुझर चालकासह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दतात्र्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, सहा. पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जगदिश गिरी, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांनी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.









