
कल्याण – मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाचा पोलीस कोठडीत मूत्यू झाला आहे. प्रदीप भानुदास ताटे ( वय- ३२) असे मूत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.बलात्कारप्रकरणी ताटेला कोळसावाडी पोलिसांनी २४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर कल्याण न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ठार मारण्याची धमकी देऊन सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल्याण पूर्वेत श्रीमलंग रोडला नांदिवली गाव परिसरात प्रदीप ताटे हा पत्नी मुलांसह राहत होता. प्रदीपच्या पत्नीला पहिल्या पतिपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रदीपची पत्नी अंधेरी येथील एका सुरक्षा संस्थेत गार्ड म्हणून नोकरी करते. त्यामुळे ती दोन-तीन दिवस नोकरी निमित्त बाहेर असते. काही दिवसांपूर्वी पत्नी कामावर गेल्याची संधी साधून प्रदीपने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन याची कुठे वाच्यत केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही बाब पीडित मुलीने बापाच्या भीतीपोटी दडवून ठेवली होती. मात्र, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला शारिरीक त्रास होऊ लागला. त्यानंतर धाडस करुन या मुलीने घडलेला धक्कादायक प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या नवऱ्या विरोधात तक्रार नोंदविली होती.









