
नवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
गेल्या ३६ तासांत दिल्लीत सुमारे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी ठिकाणी पाणी साचले आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली.
पुढील २४ तासांत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान ढगाळ राहील. अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत दिल्लीत १४७.८ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
दक्षिण दिल्ली, मध्य दिल्ली आणि पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बिहारमध्ये भिंत कोसळली, तीन ठार
बिहारमधील कैमुर जिल्ह्यात घराची भिंत कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे गेहून गावातील एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुंटुंबातील तीन महिला ठार झाल्या तर एक महिला जखमी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत तीन ठार
उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.









