
नवी दिल्ली/मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. त्यामध्ये शेतक-यांना मदत आणि भूसंपादन विधेयकाबाबत देशभर गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
एकीकडे शेतक-यांचे हीत जोपासल्याची भूमिका बोलताय, शेतक-यांना मदत करु अशा घोषणा करताय आणि दुसरीकडे प्रत्यक्षात कोणतीही मदत केल्याचे दिसत नाही. गारपीट, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. राज्यात ११०० पेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. असे असताना सत्ताधारी मात्र आम्ही अभ्यास करत आहोत, आमचे लोक जाऊन तेथे बघतील, परिस्थितीचा आढावा घेतील असे बोलतात. हा अभ्यास किती दिवस चालणार. शेतक-यांना आज तातडीने मदतीची खरी गरज आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतक-यांचे कर्ज माफ केले नाही तर तो कसा परतफेड करेल, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
ज्यांना शेतक-यांबद्दल काही माहित नाही. शेतीबद्दल माहिती नाही. शेतकरी कशावर अवलंबून आहे, ते माहित नाही. अशा चिंताजनक परिस्थितीत तातडीने मदत करण्याऐवजी सरकारच्या पोकळ घोषणांचा काय उपयोग, अशी टिकाही चव्हाण यांनी केली आहे.
त्याबरोबर, भूसंपादन विधेयकाबाबत सरकार शेतक-यांची फसवणूक करत आहे. सरकारने जमीन संपादन करायला आमचा विरोध नाही, परंतू या कायद्यात अनेक जाचक अटी आहेत. शेतक-याला न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशा अनेक अटी त्यात आहेत. यामुळे काँग्रेससह त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा या कायद्याला विरोध केला आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या ४० टक्क्यांनी वाढत असताना पंतप्रधान मन की बात करत आहे, शेतक-यांना ज्ञान नको कृती हवी, अशी टिका आप नेते आशुतोष यांनी केली आहे.
आजही देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत, सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि भाजपा सरकार फक्त मन की बात नावाच्या पोकळ घोषणा करत आहे, असे काँग्रेसचे सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. मोदी यांनी वर्षभरापूर्वी लोकसभा प्रचारादरम्यान हझिराबाग येथे लाल बहाद्दुर शास्त्री यांची जय जवान, जय किसान अशी दिलेली घोषणा आज मर जवान, मर किसान म्हणत बदलून टाकल्याचा आरोपही पटेल यांनी केला आहे. केवळ मते मिळवण्यासाठी मोदी यांनी खोटी आश्वासने दिली. प्रचारादरम्यान शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीत पन्नास टक्के वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संसदेतील एका प्रश्नाच्या उत्तरात किमान आधारभूत किंमतीचा प्रस्ताव सरकारने नाकारल्याचेही पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले.









