
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टिका केली आहे.
काँग्रेसने यासाठी भाजपाला जबाबदार धरले असून, सरकारने विरोधकांच्या आयुष्यात हेरगिरी चालवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली पोलिस राजकीय हेरगिरी करत असून, राजकीय विरोधकाच्या आयुष्यात अशा प्रकारची हेरगिरी, टेहळणी आणि अतिक्रमण हे गुजरात मॉडेल असू शकते पण हे भारतीय मॉडेल नक्कीच नाही अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर टिका केली.
दुस-या बाजूला दिल्ली पोलिसांनी आपल्या कृतीचे समर्थन करताना ही सुरक्षा तपासणी असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांना एसपीजीचे विशेष सुरक्षा कवच आहे हे नेहमीचे सुरक्षा ऑडिट होते.
कायदा-सुव्यवस्थेचा भाग म्हणून चौकशी करण्यात आली यात दुसरा कोणताही चुकीचा हेतू नव्हता असे दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस.बासी यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या तुगलक रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी केली होती.









