
यवतमाळ, दि.८ – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त यवतमाळात १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचारवंताचे विचार ऐकण्याची संधी यवतमाळकरांना मिळणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विविध स्पर्धा, व्याख्यान, पुरस्कार, किर्तन असे कार्यक्रमाचे स्वरूप असून हा महोत्सव आझाद मैदानात पार पडणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. भावना गवळी, आ. मदन येरावार, नगराध्यक्ष सुभाष राय उपस्थित राहणार आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १७ ला दुपारी दुपारी २ वाजता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ‘मजबूत लोकशाहीसाठी मतदानाकरिता ईव्हीएम मशीन योग्य की अयोग्य’ हा विषय ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता पहिले व्याख्यान होईल. विचारंवत इंजि. चंद्रशेखर शिखरे मार्गदर्शन करतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्काराचे वितरण केल्या जाणार आहे. १८ ला सायंकाळी ६ वाजता वेशभूषा स्पर्धा पार पडल्यानंतर अड. गणेश हलकारे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर’ या विषयावर मार्गदर्शन करतील. १९ फेब्रुवारीला सकाळी ‘रन फॉर शिवाजी’ शिव मेरॉथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शिव चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर दुपारी २ ते ६ या वेळात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी विविध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात येईल. ‘व्यक्तीमत्त्व विकासाचे महास्त्रोत छत्रपती शिवराय’ या विषयावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले विचार व्यक्त करणार आहे. यासह २०, २१, २२, २३ फेब्रुवारीला विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. दिलीप महाले यांनी दिली. पत्रकार परिषदेला अंकुश वाकडे, प्रवीण भोयर, सतीश काळे, डॉ. प्रदीप राऊत, योगेश धानोरकर, प्रशांत ठाकरे, प्रशांत कदम, सुदर्शन बेले, प्रकाश ठाकरे आदी उपस्थित होते.









