
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावली लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे. या चित्रपटाचे लोकार्पण यशवंतरावांच्या जन्मभूमीत म्हणजे कराड येथील प्रीतीसंगमावर होणार असून यासाठी दिग्दर्शक जब्बार पटेल. यशवंतरावांची भूमिका साकारणारे अशोक लोखंडे आणि ओम भूतकर, वैशाली दाभाडे आदि कलाकार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार गायक शंकर महादेवन आणि नंदेश उमप चित्रपटातील गाण्यांद्वारे यशवंतरावांना आदरांजली वाहतील.
यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, लोकाभिमुख निर्णय, दिल्लीमध्ये महाराष्ट्राची जपलेली अस्मिता अशा विविध टप्प्यांनी त्यांची कारकीर्द सजली होती. यशवंतरावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे खूप मोठे आव्हान होते. लीलया पेललं आहे, दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तर यशवंतरावांची ही झंझावाती कारकीर्द पटकथेतून परिणामकारकरित्या मांडण्याचं काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरूण साधू यांनी केलं आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी असून ती ना.धों. महानोर, कुसुमाग्रज आणि विठाबाई चव्हाण यांनी लिहिली असून अनेक नामवंत गायकांनी ती स्वरबद्ध केली आहेत. महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी तर लुब्ना सलिम , ओम भुतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहूल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन सय्यद लायक अली यांचे तर संकलन नितीन रोकडे यांचे आहे. लीला गांधी यांनी नृत्य दिग्दर्शन, कला व वेशभूषा शाम भूतकर आणि मोहन रत्नपारखी यांनी तर रंगभूषेची अतिशय महत्त्वाची जबाबदारी विक्रम गायकवाड यांनी सांभाळली आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’ चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासनाची असून एस्सेल व्हिजनच्या सहयोगाने हा चित्रपट येत्या १४ मार्चला राज्यभरातील सुमारे २५० हून अधिक चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.









