
लंडन- फळांचा राजा म्हणून केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ओळखल्या जाणा-या हापूस आंब्यासह अन्य चार भारतीय भाज्यांवर एक मे पासून युरोपीयन संघटनेतील २८ देशांनी बंदी घातली आहे. हापूससह अन्य भाज्यांवर घालण्यात आलेल्या या बंदीचा भारतीय कायदेतज्ञ आणि व्यापा-यांनी निषेध केला आहे.
यासंदर्भात आयोग्य विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१३मध्ये युरोपीय बाजारपेठेत भारतातून आयात केलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये इतर भाज्यांवर प्रादूर्भाव करणारे कीटक आढळल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. अर्थात समितीने ही बंदी तात्पूर्ती घातल्याचे स्पष्ट केले आहे. यात हापूस आणि आंबा, वांगी, आळू, कारले, पडवळ या भाज्यांचा समावेश आहे. एकट्या इंग्लंडमध्ये दरवर्षी तब्बल १६ दशलक्ष आंब्यांची निर्यात केली जाते. ही बंदी हटवण्यासंदर्भातील पुनः विचार ३१ डिसेंबर २०१५ रोजी घेतला जाणार आहे. या बंदीमुळे लाखो डॉलर्सचा तोटा होण्याचा दावा व्यावसाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे बंदी घालण्यात आलेली फळे आणि भाज्यांचे प्रमाण हे एकूण निर्यात केल्या जाणा-या भाज्यांच्या तुलनेत केवळ पाच टक्के असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.









