जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 13 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व अधिकारी सहभागी होणार आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाची आज बैठक झाली. त्यावेळी संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटनीस तथा जिल्हा कोषागार अधिकारी शा.व.देव, कर्मचारी नेते रविंद्र देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महसूल उपजिल्हाधिकारी एस.व्ही.सिरसुध्दे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा हिवताप निर्मुलन अधिकारी सुरेश तरोडेकर, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे, विक्रीकर अधिकारी आ.बा.पाटेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता राजेंद्र चौधरी, वरीष्ठ लेखाधिकारी ज्योती भोंडे, सह जिल्हा निबंधक एस.डी.बराटे, रेशीम विकास अधिकारी आर.वाय.म्हात्रे यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्तीचे वय 60 करावे, पाच दिवसांचा आठवडा, रिक्त पदे भरावी, आगाऊ वेतनवाढी, पेन्शन योजना पूर्वी प्रमाणे सुरु करावी आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात विविध शासकीय, निमशासकीय संघटना सहभागी होत आहे. संपाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपली एकसंघता दाखवून द्यावी व मोठ्या संख्येने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनी बैठकीत केले. संपामागची भूमिका महासंघाचे सरचिटणीस तथा जिल्हा कोषागार अधिकारी शा.व.देव यांनी सांगितली.









