ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते पंचायत समिती व आरोग्य केंद्राचे उद्घाटन
यवतमाळ दि.७: सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या गावातच विविध प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींमधून सध्या 19 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतींचे स्वरुप बदलणार असून ग्रामपंचायतीतच बँक सुविधा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 11 हजार ग्रामपंचायती ई-बँकींग सुविधेने जोडणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. श्री.पाटील यांच्याहस्ते बाभुळगाव येथील पंचायत समिती तसेच तालुक्यातील घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व राळेगाव येथील पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी बाभुळगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके होते. प्रमुख पाहूणे म्हणून खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, सभापती सुभाष ठोकळ, मनमोहनसिंह चव्हाण, प्रभाकर उईके, प्राजक्ता मानकर, पंचायत समिती सभापती प्रतिभा कडू, उपसभापती रमेश लोखंडे, जि.प.सदस्य अमन गावंडे, योगिता कोडापे, अर्चना कोडापे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक घारफडकर, माजी सभापती हिम्मत पांडे, भिमसिंग सोळंकी, कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी आदी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम गेल्या काही वर्षात राज्य शासनाने सुरु केले आहे. त्यापैकीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुविधा देण्याचा अभिनव प्रयोग शासनाने सुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात गावकऱ्यांना आपल्या कामासाठी अन्यगावी जावे लागू नये यासाठीच ग्रामपंचायतीचे स्वरुप बदलवून याठिकाणी ई-सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे श्री.पाटील म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बँकांची सुविधा नाही. त्यामुळे नाईलाजाने गावकऱ्यांना सावकाराकडे कर्ज मागावे लागते. आता ग्रामपंचायतीतच बँकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 11 हजार ग्रामपंचायती ई-बँकींगने जोडण्यात येत असून पुढील टप्प्यात उर्वरीत सर्व ग्रामपंचायती जोडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्यात ठिकठिकाणी पंचायत समितींच्या अद्ययावत इमारती उभ्या राहत आहे. केवळ इमारती उभ्या राहून उपयोगाचे नाही. याठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सुविधाही चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजे. शासन कर्मचाऱ्यांना
सुखसुविधा पुरविते त्या तुलनेत कर्मचाऱ्यांनीही चांगले काम करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांनी जागरुकतेने काम केल्यास अनेक समस्या सोडविण्याचे श्रेय त्यांना मिळेल. राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्या शाळांची प्रतवारी सुधरविणे आवश्यक आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वेळ गावाला दिला पाहिजे, असे सांगून मुलांना सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख यांचीही यावेळी भाषणे झाली. बाभुळगाव व राळेगाव येथील पंचायत समिती व घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. घारफळ येथे आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण तर बाभुळगाव येथे पंचायत समिती सभापती प्रतिभा कडू यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.










