राज्यात युतीचेच सरकार : १२ मंत्रिपदं देणार

yutisb
मुंबई – विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना – भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना – भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली असून शिवसेनेला १२ मंत्रिपदं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये ५ कॅबिनेट व ७ राज्यमंत्रीपदाचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन शिवसेना – भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटली होती. मात्र आता या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दुपारी भाजपा व शिवसेना नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा पालवे – मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते.  भाजपा व शिवसेनेला मिळालेले यश पाहता जनतेने आघाडी सरकार विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट होते. आम्ही दोघांनी एकत्र येऊनच सरकार चालवावे अशी इच्छा जनता व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची होती, त्यासाठी आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमची युती वैचारिक असून ती भविष्यातही कायम राहावी यासाठी समन्वय समिती स्थापन करु असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला १२ मंत्रिपद दिली जातील आणि त्यापैकी १० मंत्री उद्या शपथ घेतील. भाजपाचेही ८ ते १० मंत्री उद्या शपथ घेतील,या सर्वांची नावे आज रात्रीपर्यंत जाहीर करु असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच अन्य घटक पक्षांसोबतही चर्चा सुरु असून त्यांना उद्याच्या विस्तारात किंवा हिवाळी अधिवेशनानंतर होणा-या विस्तारात स्थान देण्याबद्दलचा निर्णयही आज रात्रीपर्यंत होईल असेे त्यांनी नमूद केले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रच लढवणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचे ठरवले आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाची भूमिका काय या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × 1 =