
यवतमाळ ,दि. २६ – यवतमाळला सांस्कृतीक वैभवात थर घालणारी रामनवमी शोभायात्रा शनिवार २८ मार्च रोजी निघणार आहे. या शोभायात्रेच्या भव्य आयोजनासाठी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती सज्ज झाल्याची माहिती आयोजन समितीचे राम लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामनवमीला दु. २ वा. जयहिंद चौकातील राममंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल तत्पूर्वी विश्वहिंदू परिषदेचे केंद्रीय विनायक देशपांडे आणि प्रांत कोषाध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामरथावरील श्रीराम मुर्तीचे पुजन होईल. शोभायात्रेकरिता यावर्षी रबराचा नवीन आकर्षक रथ साकारण्यात आला आहे. यवतमाळातील तरुण, तरुणी उदयास आलेले ‘शिवसमर्थ ढोल – ताशा पथक’ यावर्षी शोभायात्रेत सहभागी होवून रोहर्षीक वादन करणार आहे. टाळ मृदुंगाचा गजर करीत भजनी मंडळ व लेझीम पथकासह, दिंड्या, रामयणकालीन प्रसंगावर आकर्षक झॉकी, सामाजिक प्रबोधनात्मक विविध चित्ररथ व कला क्रिडागुणांचे सादरीकरण करणारे आखाडे, भन्नाटी, लाठ्याकाठ्या, दांडपट्टा व वाद्यवृंदाचा समावेश या शोभायात्रेत करणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. संत सेना चौकात शोभायात्रा समारोपप्रसंगी ५१ विवाहीत जोडप्यांच्या हस्ते श्रीरामाची सामुहिक आरती होणार आहे. संपूर्ण शोभायात्रे दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी ४०० बजरंग दलाचे कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत. यवतमाळ करांनी या शोभायात्रेत सहकुटूंब सहभागी होवून शोभायात्रेची शोभा वृद्घींगत करावी असे आवाहन विजय सिंघानिया, राम लोखंडे, मनोज औदार्य, अनुप चमेडीया, अजय चव्हाण व शोभायात्र समितीने केले आहे.









