
यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध विभागाशी संबंधीत ६४३९ प्रकरणे निकाली निघाली.
सदर लोकअदालत जिल्हा न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कामगार व औद्यागिक न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये एकूण २२,१६८ प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने भुसंपादन प्रकरणे, नगर परिषदेची कर अपिलाची प्रकरणे निगोशिएबल इस्टयुमेंट अॅक्टच्या कलम १३८ नुसार असलेले प्रकरणे, मोटार अपघात वाहन कायद्याची प्रकरणे, वैवाहिक वादांची प्रकरणे, बँकाची प्रकरणे, कामगार विवाद प्रकरणे, ग्राहक तक्रारी व दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे.
या लोकअदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी अनेक पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. सदर लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यासाधिश, न्यायालीन कर्मचारी, वकील, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकअदालतीच्या पॅनलवरील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. अग्रवाल यांनी दिली.









