रेल्वे अर्थसंकल्प सादर, सर्वसामान्यांना दिलासा

Railway Budget in Parliament
नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रवासी भाडयामध्ये कोणतीही वाढ न करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला.
मात्र त्याचवेळी कोणत्याही नव्या रेल्वे गाडीची घोषणा न करुन त्यांनी भ्रमनिरासही केला. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये नव्या रेल्वे गाडयांची घोषणा केली जाते. मात्र यापुढे सर्वेक्षण करुन नव्या रेल्वे गाडयांची घोषणा करु असे प्रभू यांनी सांगितले.त्यांच्या या निर्णयावर सर्वच पक्षांनी टिका केली आहे. एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रभू यांच्या रेल्वे अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र आणि मुंबईला ठेंगा दाखवला आहे.
गर्दीच्यावेळी मुंबईतला लोकल प्रवास जीव नकोसा करणारा असतो. त्यामुळे प्रभू मुंबईतील लोकलसेवेवरील वाढता भार लक्षात घेऊन काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुंबईच्या तोंडाला पाने पुसली. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या घोषणा झाल्या होत्या. त्याचे काय झाले असा सवाल बसप प्रमुख मायावती यांनी उपस्थित केला.
प्रभू यांनी या अर्थसंकल्पातून प्रवासी सुविधा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे सुविधांमध्ये फारशी प्रगती न झाल्याने गुंतवणूक कमी झाल्याचे प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पुढच्या पाचवर्षात रेल्वेने ८.५ लाख कोटींच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेला सर्वोत्तम बनवायचे असल्याचे प्रभू म्हणाले.
उत्तम प्रवासी सुविधा, सुरक्षित प्रवास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रेल्वेचे आर्थिक स्वावलंबन या चतुसूत्रीने रेल्वेचा कायापालट करण्याचे प्रभू यांचे लक्ष्य आहे. रेल्वे मधल्या स्वच्छतेसाठी रेल्वे मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरु करण्याची घोषणा प्रभू यांनी केली.
रेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
»रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ नाही- रेल्वेमंत्री
»येत्या पाच वर्षांत ८.५ लाख कोटींची गुंतवणूक करणार
»रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेणार
»रेल्वेच्या सफाईसाठी नवीन विभाग
»रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार – रेल्वेमंत्री
»विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा
»नवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३८ तर संकटसमयी १८२ हा क्रमांक एक मार्चपासून सुरु होणार
»जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा
»रेल्वेचे आयआरसीटीसी हे संकेतस्थळ अन्य भारतीय भाषांमध्येही
»महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे
»गाड्यांची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्टची सुविधा
»हिंदी आणि इंग्रजीसोबत इतर भारतीय भाषांमध्ये ई तिकीटची सुविधा उपलब्ध होणार
»मुंबईत एसी लोकल चालवणार – रेल्वेमंत्री
»पाच मिनिटात ई-तिकीट मिळणार, १०८ रेल्वेत ई-केटरिंगची सुविधा
»मोठ्या स्थानकांवर लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सुविधा
»४०० स्थानकांवर वायफायची सुविधा
»रेल्वे स्थानकांवर १७०० बायोटॉयलेट उभारणार
»स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहीम राबवणार
»मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर अलार्मची सुविधा
»रेल्वेच्या नऊ मार्गांवर ताशी २०० किमी वेगाने रेल्वे धावणार
»रेल्वे अपघात टाळण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा
»दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई प्रवासाचा वेळ कमी करणार
»देशातील चार विद्यापीठात रेल्वे संशोधन अभ्यासक्रम
»वर्धा-नागपूर तिस-या मार्गासाठी नवी योजना लवकरच
»निधी उभारण्यासाठी रेल्वे स्थानक, गाड्यांना कंपनीची नावे देणार
»कोकण रेल्वेवर तीन वर्षांत ५० हजारांना रोजगाराची संधी
»तीन हजार मानवरहीत फाटक काढून टाकणार
»सर्व्हे करुनच नव्या गाड्यांची घोषणा- प्रभू
»व्हील चेअरची सुविधा आता ऑनलाईन बुकिंग करता येणार
»लोकल रेल्वेला आधुनिक बनवण्याची योजना
»महिला सुरक्षेसाठी निर्भया फंडातून निधी उपलब्ध करुन देणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one + 7 =