सोपोर – जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये रविवारी सकाळी सुरक्षापथके आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. सुरक्षापथकांनी या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा हा दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शफी शेख असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो या भागातील एका घरात लपून बसला होता. ठार झालेला दहशतवादी हिजबुलच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता असे पोलिसांनी सांगितले.पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. सोपोरमधल्या एका गावात हा दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या गावात अजूनही एक दहशतवादी असावा असा सुरक्षापथकांचा कयास आहे. या दहशतवाद्याला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे.









