
यवतमाळ – भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते. मात्र सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून होळी साजरी केली जाते. पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. यावर्षी होळीच्या दिवशी वृक्षतोड थांबवावी म्हणून वनविभागाने जनजागृती सुरु केली आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्ष पुजन करण्याची वेळ आली असे फलक शहरात लावले आहे.
होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. होळीच्या पर्वावर होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी, लाकडांची होळी न करता वृक्षपूजन करून होळी साजरी करा असे आवाहन वनविभागाने केले आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्षपूजन करण्याची वेळ आली आहे असा संदेश देणारे फलक शहरातील शासकीय कार्यालयासह सार्वजनीक ठिकाणी वनविभागाने लावले आहे. वृक्ष वल्ली अम्हा सोयरी असा संदेश संत तुकारामांनी दिला. त्याच संदेशाला अनुसरुन आज ‘वृक्ष देवो भव’ हा नवा मंत्र आत्मसात करून सार्वांनी वाटचाल केल्यास निसर्ग संवर्धनास मोलाचा हातभार लागेल. होळी सणला वृक्षपुजन केल्यास आपल्या जगण्यासाठी प्राणवायु देणाºया वनाराईची कत्तल तर कमी होईलच शिवाय भावी पिढीलाही पर्यावरण संरक्षणाचा संदेश मिळेल. होळीच्या दिवशी लाकडांची होळी न करता सार्वजनिक ठिकाणावरील काडी कचरा गोळा करुन त्याची होळी करावी. तसेच होळीच्या दिवशी एक झाड लावावे, तसेच उन्हाळ््यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा. असे आवाहन उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा व दारव्ह्याचे वनपाल श्रीराम कडूकार यांनी केले.









