
कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
यवतमाळ – खरीप हंगामात कोट्यवधींचे बियाणे विकले जाणार आहे. याच संधीचा फायदा लाटण्यासाठी काही बोगस कंपन्यांनी नवीन वाण बाजारात आणले असून शेतकºयांच्या माथी मारल्या जात आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने शहरातील एका घराची झाडाझडती घेतली असता तब्बल चार लाख रुपये किंमतीचे बोगस बीटी कपाशी बियाणे जप्त केले. ही कारवाई धामणगाव रोडवरील चांदोरेनगरातील संजय पंढरीनाथ परडखे यांच्या घरी करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात दाखल झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. काही बोगस बीटी वाणाला कृषी आयुक्तालयाने विक्रीची परवानगी दिली नाही. तरी देखिल हे बियाणे कृषी केंद्रातून विकल्या जात आहे.
शेतकºयांची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. कृषीचा सर्वात मोठा हंगाम म्हणून खरीपाकडे बघितल्या जाते. याच हंगामात बियाण्यांची सर्वात जास्त उलाढाल होते. याचा फायदा लाटण्यासाठी बिटीच्या नावाखाली बियाणे बाजारात दाखल झाले आहे. त्यामध्ये ७५ टक्क्याच्यावर वाण हे कपाशीचे आहे. बाजारात विक्रीस आलेले सर्वच वाण प्रमाणित नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषी आयुक्तालयाने कृषी विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. बीटीला आयुक्तालयाच्या प्रमाणपत्रानंतर विक्रीची परवानगी देण्याच्या सूचना आहेत असे असतानाही काही कंपन्यांनी नवे वाण परवानगीशिवाय बाजारात आणले आहे अथवा आणल्या जात आहे.
चांदोरेनगरातील संजय परडखे याच्या घरी बोगस बिटी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची ‘टिप’ कृषी विभगाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून घराची झाडाझडती घेतली असता बादशहा बिटी कपाशीचा साठा आढळून आला. दोन रुममध्ये हा साठा लपवून ठेवला होता. कुणाच्याही नजरेस साठा पडणार नाही,याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. मात्र भरीरी पथकाने टाकलेल्या धाडीत बोगस बिटीच्या १४ बॅग जप्त करण्यात आल्या. या बियाण्यांची किंमत ३ लाख ४३ हजार १७० एवढी आहे. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण अधिकारी तथा कृषी अधीक्षक संजय दत्तात्रय देशमुख यांच्या तक्रारीवरून संजय परडखे याच्याविरुध्द अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माहिती सुरू होती.









