लालदिवा !

आपण पाय पुढे काढला की
वाटाच दिसेनाशा होतात
पतंगाच्या दोरीसारखे
कुणाच्या हाती सूत्र असावे वाटांचे ?
दिशा अंधारून येतात
जिवंत देह फाडणार्या लांडग्यांचा आवाज
ऐकू येतोय हा
की, माणसांत प्रेत शोधणारे मसण्याऊद हे
हे वंशज कुणाचे ?
पार्श्वभागात वाटा घालून बसलेले
हे पामेरियन कुत्रे
आपण पाय पुढे काढला की
सभ्य तोंडाने भुंकतात.
या वाटेच्या वाटेला आपण जाऊ नये
पाय पुढे काढून भुतावळ जागवू नये
असा दम देणारे
थोर नेते आपलेच का ?
पायात घुंगरू बांधून आलेल्यांना
वाटा वळणे सारीच दिसली
हा कोणत्या हिजड्यांचा फड ?
आपले स्वप्न यांनी हायजेक करावे
एअर कंडीशन्ड हवेलीत बसून
झोपड्यांना ब्ल्याकमेल करणारे
हे हरामखोर
दुडूदुडू धावणाऱ्या सूर्यपुत्रांना
ओलीस ठेवून मागताहेत
कपाळावर लालदिवा ..!
भूमिपूजनावाचून
हापशीच खोदल्या गेली नाही
आपल्या गावात येत नाही यांचा रस्ता
कासावीस झालेले हे पाणीदार डोळे
जीभ धरून बाहेर आले
किसानाचे शेत कसे फाशी गेले
आसवात ओलेती मजूर
घाण उपसतांनाही भावते दलालांना
रक्ताळलेल्या टांचा घेऊन
काचा वेचणारा बालमजूर पाहून
सुचते यांना तीर्थाटन
पाणी आटलेले हे कुणाचे पुढारी
बिसलेरीच्या शिशीत बंद
यांची शुष्क गर्जना
आधी यांनाच करू फ्रीज
आपण पाय पुढे काढला की
वाटा तयार होतील असे करू
यांच्या वंशाचा लाल दिवा
हापशीच्या पाण्याने विझवून देऊ.

आनंद गायकवाड
[ आखरीचं तुव्हच सडान चिबवीन ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = four