यवतमाळ – समाजात अनेक जाती उपजाती असून शासन जातीच्या आधारावर आरक्षण देते. राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असून जाती उपजातीमध्ये ओबीसी, एससी, एनटी व एसबीसी असे चार प्रवर्ग आहे. महसुली व शैषणिक आधारावर सवलत देण्यात येत असल्यामुळे लिंगायत उल्लेख असलेल्या ओबीसी, एसबीसी जातीला आरक्षण देण्यात आले नाही. या जातींना आरक्षण द्यावे. अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी आज विश्राम गृहात आयोजित पत्रकार परीषदेत केली. यावेळी अभय कल्लावार, उमाकांत शेटे, विकास मुलंगे, अनिल हमदापुरे उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील राजेगाव टिटवी येथे आज आयोजित ६ व्या लिंगायत आरक्षण परीषद मेळाव्या निमित्त ते यवतमाळात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात व परराज्यात लिंगायत समाजाचा मोठा विस्तार आहे. जाती उपजातीमुळे सवलतीचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे समाजाचा शैषणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, स्तर उंचाविण्यासाठी शिवा संघटना स्थापण करण्यात आली. लिंगायत, लिंगेडर, माला, जंगम, बुडगा, तेली, वाणी अशा विविध उपजातीना लिंगायत शब्द जोडून असल्याचे कारण पुढे करून सवलत देण्याचे टाळले जात आहे. याकरीता शिवा संघटना आंदोलनाच्या माध्यमातुन समाजाला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघटनेच्या आंदोलनाला यश येत असल्याचे सांगत काही जातीचा समावेश शासनाने केला असल्याचे धोंडे यावेळी म्हणाले. आता ओबीसी व एसबीसी चा आरक्षणात सहभाग व्हावा याकरीता संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणार असल्याचे धोंडे यांनी सांगितले.









