लोकसभा निवडणूक, सुरक्षेसाठी दोन लाख जवान

cdsjk
नवी दिल्ली – लोकसभेच्या नऊ टप्प्यांमध्ये होणा-या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट लागू नये, निवडणूका शांततेत पार पाडाव्यात यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेची जोरदार तयारी केली आहे.
संपूर्ण देशात दीड महिना चालणा-या मतदान प्रक्रियेसाठी निमलष्करी दलाचे दोन लाख शस्त्रसज्ज जवान, हजारो गाडया आणि डझनभर हॅलिकॉप्टर तैनात केली आहेत. सात एप्रिलपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. देशातील एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघात ८१.४ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हिंसाचाराची शक्यता असलेली माओवाद प्रभावित राज्ये, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये सुरक्षा बंदोबस्तावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाच्या जवानांसह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आसाम रायफल्सच्या जवानांचाही बंदोबस्त असणार आहे.
निवडणूक काळात निमलष्करी दलाच्या जवानांच्या प्रवासासाठी गृहमंत्रालय शंभरहून अधिक ट्रेनचा वापर करणार आहे. गृहमंत्रालयाने रेल्वेला तशी ट्रेन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सुरक्षेच्या गरजेनुसार या जवानांची तैनाती केली जाईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर केला जाईल जवळचा प्रवास रस्ते मार्गाने केला जाईल. त्याशिवाय हजारो खासगी गाडयाही भाडयावर घेण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = five