
*सहा लोकसभा निवडणूकांचा समावेश * महत्वाचे दूरध्वनी व उपयुक्त माहिती
यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गेल्या सहा लोकसभा निवडणूकांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारींचा समावेश असलेली पूर्वपीठिका जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह परिविक्षाधीन आयएएस अधिकारी राधाविनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे,
जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसिलदार राजेंद्र अडपावार आदी उपस्थित होते.सदर पूर्वपीठिकेत सन 1991 पासून झालेल्या सहा लोकसभा निवडणूकींची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यात मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतदानाचा समावेश आहे. यासह होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानेही उपयुक्त अशी माहिती आहे. विशेष म्हणजे पुर्वी स्वतंत्र असलेल्या यवतमाळ व वाशिम या लोकसभा मतदारसंघाची स्वतंत्र माहिती देण्यात आली आहे. सद्या असलेली मतदारांची संख्या, निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी काय करावे, काय करू नये याबाबत उपयुक्त मार्गदर्शिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी, निवडणूक आयोग नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई, मिडीया सेंटर आदींचे महत्वपूर्ण दुरध्वनी क्रमांकही पूर्वपीठिकेत देण्यात आले आहे. सदर पूर्वपीठिका मागील लोकसभा निवडणूकांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी, निवडणूक विश्लेषक, निवडणूकीसंर्भात माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.









