लोकसभेचा हिशेब चुकता करा!, मगच विधानसभा बोला

मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
यवतमाळ – विधासभा मतदारासंघासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आलेले मनसेचे सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी आज शुक्रवारी स्थानिक विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश आ. शिंदे यांनी दिल्यावर कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा हिशेब चुकता करा, नंतरच विधानसभा बोला, असा सूर आवळला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यांना उमेदवाराने पैसे न दिल्याने निवडणुकीचे कर्ज कार्यकर्त्यांना फेडावे लागत असून, कार्यकर्ते दुरावल्या गेल्याने आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना नेत्यांपुढे व्यक्त केल्या.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मनसे चांगली वाढत असल्याचे पाहूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सभेसाठी होकार दिल्याने व यवतमाळात प्रथमच राज ठाकरे यांची सभा होत असल्याने सच्चे कार्यकर्ते जाम खूश होते. अभूतपूर्व अशी सभा यवतमाळात झाल्यानंतर मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने कामाला लागले. मतदारसंघात दोन जिल्हे असल्यामुळे उमेदवाराने यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दिली. प्रचारासाठी, आॅटो, लाऊडस्पिकर, कार्यकर्त्यांना चहा, पाणी आदी खर्च केला.  लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यानंतर उमेदवार यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलाच नाही. कार्यकर्ते लोकांचे देणे बाकी असल्याचे फोन लावत असताना, पैसे देण्याचे उमेदवाराने टाळले. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्षात हालचाली सुरू झाल्या असताना, मनसेही विधानसभा काबीज करण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्याच्या दौºयावर निघाली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणिस आ. शिशिर शिंदे, माजी आ. जयप्रकाश बावीस्कर व शिरीष सावंत जिल्ह्याच्या दौºयावर काल गुरुवारपासून आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी पुसदमध्ये बैठक घेतली. आज शुक्रवारी यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विश्रामगृहात घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च उमेदवाराने आमच्या बोकांडी बसविला आहे. याचा हिशेब आधी चुकता करा, त्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे बोला. असा सूर आवळल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी, सागर पुरी, आनंद एंबडवार, अनिल हमदापुरे, संजय बोकसे, मंगेश रुईकर वणीसाठी जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता काळे, दिग्रससाठी विकास पवार, केळापूर-आर्णीसाठी जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. याचा अहवाल राज ठाकरे यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच   उमेदवारांची घोषणा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 5 = thirty five