मुंबई – संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणा-या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.
वांद्रे पूर्वमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ४२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान क्रेंद्राबाहेर नागरिकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नारायण राणे यांच्या यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक देशव्यापी बातमी बनली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेसोबत एमआयएमही रिंगणात आहे.
या मतदासंघातून १० उमेदावार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये चार अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२०१४च्या निवडणुकीत या मतदारसंघात मोदींची हवा असूनही ४२ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ६० टक्क्यांपर्यंत मतदान करून घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते भिडले असून, नारायण राणे यांनी गेल्या ११ दिवसांत हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.
तासगाव-कवठे महांकाळमध्येही पोटनिवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव-कवठे महांकाळमध्येही आज मतदान होत आहे. या मतदानालाही आठ वाजल्यापासून सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत १६.७ टक्के मतदान झाले आहे. या जागेवरुन पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील निवडणूक लढवत आहेत. सुमन पाटील यांच्याविरोधात महत्त्वाच्या पक्षांनी आपला उमेदवार उभा केलेला नाही.










