विदर्भात ६२.३६ टक्के मतदान

DSC_9201 copy

DSC_9258 copyनागपूर – विदर्भातल्या दहा लोकसभा मतदार संघात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले आहे. मागील निवडणूकीशी तुलना केल्यास विदर्भात मतदानाचा टक्का वाढला असून येथे सरासरी ६२.३६ टक्के मतदान झाले आहे. २००९ मध्ये हेच प्रमाण ५७.७ इतके होते.
सर्वाधिक मतदान हे गडचिरोली, भंडारा, अकोला आणि अमरावती या मतदार संघात झाले आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मोठया प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान विदर्भातील १० लोकसभा मतदार संघात झाले. काही तुरळक घटना वगळता सर्वच मतदार संघात मतदान हे शांततेत झाले. उन्हाचा कडाका लक्षात घेता सुरूवातीच्या मतदानावर त्याचा परिणाम दिसून आला. दुपारपर्यंत मतदान अगदीच संथ गतीने सुरु होते. सरासरी २५ टक्केच मतदानाची नोंद दुपारी तीन वाजेपर्यंत झाली होती. त्यामुळे मतदान मागील वेळे पेक्षा कमी होते की काय अशी शंका सर्वांनाच वाटत होती. मात्र संध्याकाळी मतदानाला वेग आला. विशेष म्हणजे मागील वेळ पेक्षा जास्त मतदान यावेळी विदर्भातील दहाही लोकसभा मतदार संघात झाले आहे. त्यात अकोला, अमरावती, भंडारा आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ६५ टक्के मतदान झाले आहे. तर बुलढाणा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच ५८.६६ टक्के मतदान झाले. तर बीग फाईट असलेल्या नागपूर मतदार संघात ५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त मतदान झालेल्या अमरावती मतदारसंघात दुपापर्यंत केवळ १५ टक्केच मतदान झाले होते. मात्र संध्याकाळी येथील मतदानाचा वेग वाढला होता.
दरम्यान नागपूर मध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी टाऊन हॉल येथे जाऊन मतदान केले. नागपूरात विलास मुत्तेमवार, भंडा-यात प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, अमरावतीत नवनित कौर राणा, शिवाजीराव मोघे, संजय देवतळे, सागर मेघे या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
विदर्भात झालेल्या मतदानानंतर या प्रमुख उमेदवारांसह जवळपास २०१ उमेदवारांची भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे.

विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघ
मतदानाची टक्केवारी
बुलढाणा ५८.६६
अकोला ६५.००
अमरावती ६५.००
वर्धा ६१.००
रामटेक ६२.००
नागपूर ५९.००
भंडारा ६५.००
गडचिरोली-चिमूर ६५.००
चंद्रपूर ६३.००
यवतमाळ ६०.००
सरासरी- ६२.३६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = fifty four