विदर्भाला सर्मथन द्या, अन्यथा ‘नोटा’ चा वापर ; विदर्भ कनेक्टचा उमेदवारांना इशारा

vidarbha_map
नागपूर : राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा न दिल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी नकाराधिकाराचा अधिकार असलेल्या ‘नोटा’ (None of the above) या प्रभावी पर्यायाचा विचार करण्यात येईल, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी चळवळीने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी व त्यांच्या राजकीय पक्षांनी येत्या २६ मार्चपर्यंत विदर्भाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा ‘विदर्भ कनेक्ट’शी जुळलेल्या सर्व विदर्भवादी संघटना एकत्रित येऊन संपूर्ण १0 लोकसभा मतदार संघात ‘नोटा’ चा प्रचार आणि प्रसार करतील, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अँड. मुकेश सर्मथ यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिला. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी कुणालाही मतदान करायचे नसल्यास मतदाराला यावेळी प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने ‘नोटा’ (यापैकी कोणताही नाही) हे बटन दाबण्याचा अधिकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज अधिक बुलंद करण्याच्या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ या चळवळीने ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. अँड. सर्मथ यांनी यावेळी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु निवडणुकीच्या वेळेस या राजकीय पक्षांना त्याचा विसर पडतो. अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत विदर्भातील मतदारांची होत असलेली फसवणूक यापुढे ही जनता सहन करणार नाही, म्हणूनच आम्ही लोकशाहीतील या परिणामकारक आयुधाचा वापर करायचे ठरवले आहे आणि तसे जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत. या मोहिमेंतर्गत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनात शपथपत्र लिहून घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे उमेदवारांनी किंवा त्यांच्या राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यास मतदारांनी मतदान यंत्रातील ‘नोटा’चे बटन दाबावे असे आवाहनही या पत्रपरिषदेत करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘जनमंच’ या स्वयंसेवी संस्थेने अलीकडेच नागपुरात घेतलेल्या जनमत चाचणीत ५ लाख ४७ हजार लोकांनी विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला. तसेच अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतही बहुतांश नागरिकांनी सर्मथनार्थ कौल दिला. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणा राज्याची निर्मिती केली. परंतु विदर्भाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे हेतुपुरस्सर टाळत आहे. विदर्भातील जनतेचा कौल लक्षात घेता, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भ राज्य व्हायला हवे, या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ ही लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. या चळवळीत जुळलेल्या नागरिकांचा कुठलाही राजकीय स्वार्थ किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रपरिषदेला वेळी विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विष्णू मनोहर, कोषाध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, कार्यकारिणी सदस्य अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − = 8