
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.
बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन, फडणवीस सरकारने पहिला अ़डथळा पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला अनुकूल असलेली भूमिका तसेच संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणे कठिण होते तशीच शिवसेनेला काही मते फुटण्याचीही भिती होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विजयाराज औटी आणि काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते.









