मुंबई- विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव ४५ विरूद्ध २२ असा मंजूर झाला. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात ४५ मते मिळाली तर विश्वासाच्या बाजूने २२ मते पडली. शिवसेनेने मतदानावेळी सभात्याग केला.
राष्ट्रवादीचे आमदार अमरजित पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादीला भाजपाने उघड साथ दिली. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी हा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य आहे व लोकशाहीचा गळा घोटणारा आहे असे विधान परिषदेत या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सांगितले.
सभापतींच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.










