विभागीय आयुक्तांकडून निवडणूक तयारीचा आढावा

1212
यवतमाळ: येत्या १० एप्रिल रेाजी यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड यांनी गार्डन हॉल येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी होणारी निवडणूक मुक्त व नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन केले.
बैठकीला विभागीय आयुक्तांसह अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बिपीन बिहारी, निवडणूक निरिक्षक के.डी.कपाडीया, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, महसूल उपायुक्त श्री.चिमाजी, अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्रक्रीयेतील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यावेळी बन्सोड यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांचा आढावा घेतला. निवडणुकीत काही केंद्र उपद्रवी ठरतात, अशा केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर निवडणूक आयोगाचा जोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. युवावर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर ठिकठिकाणी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात यावे.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर अनावश्यक व्यक्तिंचा प्रवेश होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने संबंधितांनी मतदान सुरु होताच अगदी सुरुवातीपासूनच सक्तीचे धोरण अवलंबिने आवश्यक आहे. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहीले पाहिजे. अनेक केंद्रांवर मतदारांच्या मतदानासाठी
रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पुरेशा खोल्या उपलब्ध नसल्यास बाहेर शामियाना टाकण्याच्या सूचना बन्सोड यांनी केल्या. बिहारी यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सुरुवातीस निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून चांगल्या पध्दतीने निवडणूक पार पडेल, असे सांगितले. पोलीस अधीक्षक शर्मा यांनी पोलीस विभागाच्या तयारीची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघातील तयारीची माहिती दिली. शेवटी आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 − three =