विमानाला म्हशीची धडक

jpg
सुरत (प्रतिनिधी) – सुरतहून दिल्लीकडे निघालेल्या विमानाचे टेकऑफ होत असताना सुरत विमानतळावर स्पाइसजेट कंपनीच्या प्रवासी विमानाला म्हशीने धडक दिली. यावेळी विमानात एकूण १४६ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
स्पाइसजेट कंपनीचे बोइंग ७३७- ८०० हे विमान उड्डाण क्रमांक एसजी- ६२२ द्वारे सुरतहून सायंकाळी सात वाजता दिल्लीला निघाले होते. यात १४० प्रवासी आणि सहा विमानातील कर्मचारी होते. विमान टेक ऑफ करत असताना धावपट्टीवर आलेली म्हैस विमानाच्या इंजिनाला धडकली. यात सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी विमानाच्या इंजिनाचे मात्र मोठे नुकसान झाले. यानंतर हे विमान रद्द करुन रात्री अकरा वाजता पर्यायी विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीला रवाना करण्यात आले.
धावपट्टीवर पुरेसा प्रकाश होता. मात्र बाजूच्या मैदानातील अंधारातून अचानक एक म्हैस पुढे आली आणि तिची विमानाला धडक बसली. वैमानिकाच्या ते लक्षात आले परंतू विमानाच्या वेगामुळे ही धडक टाळणे अशक्य झाल्याचे स्पाइसजेट कंपनीने सांगितले.
यापूर्वी जुलै २००९ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानाला नागपूर विमानतळावर डुकराची धडक बसली होती. तर मार्च २०१० मध्ये मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्यांवर आलेल्या कुत्र्यांमुळे सुमारे अर्धा तास विमानांचे उड्डाण थांबवावे लागले होते.
सुरतच्या या अपघातामुळे विमानतळाच्या धावपट्टी भागात म्हैस पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 7 = forty two