
भंडारा – जिल्ह्यातील आंधळगांव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या कांद्री परिसरातील एका गावातील संपन्न व सुशिक्षित कुटुंबातील ३७ वर्षीय विवाहित व दोन मुलांच्या आईने एका अल्पवयीन प्रियकरासोबत वेगळा संसार थाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आतापर्यंत पुरुषांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या नित्य – नव्या घटना समोर येत असतात. परंतु हे प्रकरण थोडेसे वेगळे आहे. यामध्ये विवाहित महिलेने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमजाळात ओढून त्याला आपल्यासोबत पळवून नेले आहे. या प्रकरणात प्रियकर अल्पवयीन असल्याने विवाहितेली तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
या विवाहितेने या अल्पवयीन मुलाला मागील एक वर्षापासून आपल्या प्रेमपाशात गुंतवून ठेवले आहे. आता आपल्या या छोट्या प्रियकराबरोबर स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने आरोपी महिलेने त्याला पळवून नेऊन घरोबा थाटला. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या घरच्यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलेचा पती सरकारी नोकरदार आहे. घरी सर्व सुखसुविधा असताना, स्वत: महिलाही सुशिक्षित आहे आणि तिला नऊ वर्षा मुलगा व सहा वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये असताना तिने हे पाऊल उचलले आहे. पती नोकरीला गेल्यानंतर घरी एकटीच असणार्या या महिलेने शेजारी राहणार्या एका १७ वर्षीय मुलाला आपल्या प्रेमजालात ओढले. मागील एक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत. आता लपून- छपून भेटण्याऐवजी आपण आपला वेगळा संसार थाटू, असे ठरवून त्यांनी घरातून पळून जाण्याची योजना आखली. महिलेने या मुलाला त्याच्या मावशीकडे रामटेकजवळील नगरधन येथे जाण्यास सांगितले. व ठरल्याप्रमाणे ती दुसर्या दिवशी रामटेकला पोहोचली. दूरध्वनी करून तिने मुलाला बोलावून घेतले व ते सरळ मौदा येथे गेले. तेथे त्यांनी एक भाडयाने खोली घेऊन आपला संसार थाटला. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने आंधळगांव पोलीस ठाण्यात दाखल केली तर तिकडे मुलाच्या मावशीने आपला भाचा बेपत्ता असल्याची तक्रार रामटेक पोलिसात नोंदवली. रामटेक व आंधळगांव पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांची लोकेशन प्राप्त केली असता तो मोबाईल क्रमांक मौदा येथे असल्याचे समजले. लगेच पोलीसांनी मौदा गाठून त्या महिलेसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३६३ व ३४२ भादंविसं कलम ४/१२ व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.









