
जळगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या व तरसोद येथील सासर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहीतेने मंगळवारी दुपारी तरसोद येथील रेल्वेलाईनजवळ आपल्या पाच महिन्यांच्या जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या दीपमाला धनराज सोनवणे ( वय २१) हीचा ७ जून २०१३ ला तरसोद येथील रेल्वेत नोकरीस असलेले धनराज सुधाकर सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाले तेव्हा दीपमालाच्या आजोबांनी लग्नासाठी ५० हजार रुपये व दोन तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा सोनवणे याला ठेका घ्यायचा असल्याने सातत्याने दीपमालाकडून तिचा नवरा धनराज, सासरा व सासू पैशांची मागणी करीत होते. दीपमालाची माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व तिचे वडील भंगार गोळा करण्याचे काम करीत असल्याने ती माहेरून पैसे आणू शकत नव्हती. त्यातच तिला दोन जुळी मुले झाली. दीपमालाला होणारा त्रास वाढत असल्याने तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यावरून दीपमालाचे वडील मंगळवारी सकाळीच तरसोद येथे जाऊन तिच्या सासरच्या मंडळींची समजूत काढून आले होते. दरम्यान तिचे वडील तिच्या सासरहून निघाल्यानंतरही तिला त्रास सुरूच राहिल्याने दीपमालाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपली मुले श्रेयस आणि श्रावण यांना कडेवर घेऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. रेल्वे तीच्या अंगावरून चालून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही बाळही रेल्वेचा फटका लागल्याने जागीच गतप्राण झाली.
ही घटना समजताच दीपमालाच्या नातेवाईकांनी तरसोदकडे धाव घेतली. यावेळी तिची सासू घराच्या शौचालयात लपून बसली होती, तर नवरा आणि दीर हे दोघे घरून पसार झाले होते. मातेसह दोघा चिमुकल्यांचे मृतदेह घेऊन नातेवाईक जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर सासरा सुधाकर सोनवणे, दीर आनंदा सोनवणे सासू व जेठाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा याच्या पहिल्या पत्नीने देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या पत्नीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे उपस्थितांनी सांगितले.









