विश्वचषकासाठी टीम इंडिया जाहीर

Indian Squad for World Cup 2015
मुंबई – वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माच्या समावेशाने भुवया उंचावल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी दोघेही तंदुरुस्त होतील, असा विश्वास बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी मंगळवारी संघ निवडीनंतर व्यक्त केला.
‘‘खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या जडेजावर सध्या पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू आहेत. त्याच्या दुखापतीत सुधारणा आहे. निवडीपूर्वी जडेजाच्या दुखापतीबाबत आम्ही बीसीसीआयच्या फिजियोकडून संपूर्ण माहिती मागवली. पुढील १० दिवसांत तो सरावाला सुरुवात करेल, असे फिजियोंनी सांगितले. इशांतला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे. त्याची दुखापत गंभीर नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत (सिडनी) खेळू नको, असा सल्ला फिजियोंनी दिल्याने त्याला विश्रांती देण्यात आली,’’ असे पटेल यांनी म्हटले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जडेजाची निवड झाली होती. मात्र एकही कसोटी तो खेळू शकला नाही. शेवटी त्याच्या जागी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची निवड करण्यात आली. इशांतला तीन कसोटीत केवळ ९ विकेट घेता आल्यात.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटीतील सहा डावांत केवळ एकच अर्धशतक ठोकणारा सलामीवीर शिखर धवनचा १५ सदस्यीय संघात समावेश आहे. त्याच्यासह रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर डावाची सुरुवात करतील. गरज भासल्यास रहाणे मधल्या फळीत खेळू शकेल. त्याच्यासह विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मधल्या फळीत समावेश आहे.
चार मध्यमगती आणि तीन फिरकीपटूवर भारताची गोलंदाजीची धुरा आहेत. मध्यमगती चौकडीत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा आणि उमेश यादवचा समावेश आहे. या चौकडीच्या जोडीला अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी आहे. ऑफस्पिनर आर. अश्विनसह डावखुरा अक्षर पटेल तसेच रवींद्र जडेजावर फिरकी मा-याची भिस्त आहे.
धडाकेबाज सलामीवीर वीरेंदर सेहवाग, गौतम गंभीर, मागील वर्ल्डकपचा ‘हीरो’ युवराज सिंग, मुरली विजय आणि रॉबिन उथप्पाच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांना संघात स्थान मिळाले नाही. मुख्य सिलेक्टर संदीप पाटील यांनी प्रशिक्षक फ्लेचर आणि कर्णधार धोनीशी टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
विद्यमान कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात होणा-या तिरंगी मालिकेसाठी भारताच्या संघाची मंगळवारी घोषणा झाली. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या १५ जणांचाच यात समावेश आहे. मात्र राखीव म्हणून धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा या मध्यमगती दुकलीला संघात स्थान देण्यात आलेले आहे. तिरंगी मालिकेला १८ जानेवारीपासून सुरुवात होईल. यात ऑस्ट्रेलिया आणि भारतासह तिसरा संघ इंग्लंड असेल. तिरंगी मालिकेसाठीचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six + = 15