
पांढरकवडा – तालुक्यात विविध दोन घटनेत विहिरीत बुडून तिन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना आज गुरूवारी घडल्या. शेतात विहीरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर त्याना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
झिबला हुसेन परचाके (६०), चेंडकु रामपुरे (४०) रा. करंजी, अमित पुरुषोत्तम नवले (२५) रा. रामपूर कारेगाव अशी मृतकांची नावे आहे. करंजी येथील कांबळे यांच शेतात झिबला व चेंडकु हे काम करीत होते. दरम्यान तहान लागल्याने झिबला हे शेतातीलच विहीरीवर पाणी पिण्यासाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन ते विहीरीत पडले. ही बाब निदर्शनास येताच त्याना वाचविण्यासाठी चेंडकुने विहीरीत उडी टाकली. त्यामध्ये त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तर अमित नवले हा रामपूर कारेगाव येथील शेतकरी प्रकाश सहस्त्रबुद्घे याच्या शेतात गेला होता. दरम्यान सकाळी ७ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी विहीरीवर गेला. यावेळी पाणी काढताना तोल जाऊन तो विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामे करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या घटनांनी तालुक्यात शोककळा पसरली आहे.









