
यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील रायसा व सगदा येथे शेतात वीज पडल्याने दोन महिलांसह दोन मुली ठार झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी चार वाजताचे दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रायसा येथील शेतकरी विजय बाबाराव मंगाम यांच्या शेतात त्यांची पत्नी गिता विजय मंगाम (३५), परिंदा लक्ष्मण मंगाम (१३) व ममता बाबाराव मंगाम (१४) ह्या कामे करीत होत्या. अशातच दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने त्या तिघीही घटनास्थळीच ठार झाल्या. तर पारवा परिसरातीलच सगदा येथे दुपारचे दरम्यान मलकन्ना बंकीनवार यांच्या शेतात वीज पडल्याने मीरा नारायण आदीरकार (५२) ही महिला ठार झाली आहे. या घटनेची वार्ता पसरताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. याघटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम.एम. जोरवर, पंचायत समिती सभापती रुपेश कल्यमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









